EDU

Part – 2 “कॉमर्सच्या विद्यार्थांनी जपानी भाषा का शिकावी? / कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जापान मधील संधी”

नमस्कार मित्रांनो,

“कॉमर्सच्या विद्यार्थांनी जपानी भाषा का शिकावी? / कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जापान मधील संधी” या पोस्टला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद.

तुमच्या सर्वांचे वेगवेगळे प्रश्न मला मिळाले आणि त्या प्रश्नांमधून मला बरंच काही लिहिता येण्या सारखे आहे. पण  आत्ता आधी सुरुवात करताना प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या ऐवजी मी तुम्हाला जापान मध्ये कशा प्रकारे काम करावे लागेल किंवा काम कसे करतात या संदर्भात थोडीशी माहिती देतो. .

कारण या माहितीच्या बळावर तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही आत्ता जे काही शिकत आहात व त्या त्यानुसार पुढे आपल्याला कशा प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

जपानी लोकांना लहानपणा पासूनच टीमवर्क आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर सार्वजनिक जीवनात कशी वर्तणूक असावी, हे शिकवलेले असते त्यामुळे जपानी लोक हे स्वतः पेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा व सार्वजनिक ठिकाणच्या स्वतःच्या वर्तणुकीची जास्त काळजी घेतात.

याचा प्रत्यक्ष अनुभव हा तुम्हाला जापान मधील कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रत्येक ऑफिसमध्ये पुरेपूर जाणवतो.

म्हणजेच काय तर आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांची आपण काळजी घ्यायची आणि प्रत्येक जणांनी हे जर का केले तर आपोआपच सर्वजण एकमेकांची काळजी घेतात.

मग त्याचा कामाशी काय संबंध?

आहे ना नक्कीच संबंध आहे, कारण का तुम्ही जे काम करता त्या कामांमध्ये तुम्हाला आजूबाजूचे लोक मदत करतात किंवा जर का तुम्हाला काम येत नसेल तर ते काम शिकवणे ही तुमच्या वरच्या वरिष्ठ लोकांची जबाबदारी असते किंवा आजूबाजूच्या लोकांची जबाबदारी असते.

जापान मध्ये टीमवर्क याला खूप महत्त्व आहे आणि जर तुम्ही टीमवर्क करत असाल तर तुम्हाला नक्कीच तुमचे जपानी सहकारी मदत करतील.

आता मी मूळ मुद्द्यावर येतो ते म्हणजे, तुम्ही सध्या जे काही शिकत आहात त्या शिक्षणावरून वरून तुम्ही जापान मध्ये येऊन काय काम कराल ?

मुलतः, जापान मध्ये तुमच्या शिक्षणानुसारच नोकरी करावी असे बंधन नाही. जसे बीएससी झालेल्या माणसांनी केमिकलचे काम करावे किंवा इंजिनिअर झालेल्या माणसांनी इंजिनिअरचे काम करावे किंवा कॉमर्स माणसांनी अकाउंटिंगचे काम करावे ही संकल्पना नाही.

तुमचा विचार बरोबर आहे, तुमचे स्पेशलायझेशन हे नक्कीच आहे व त्याप्रमाणेच मी गेले १५ वर्ष अकाऊंट फायनान्स मध्ये काम करून इथे सुद्धा फायनान्स मध्येच काम करत आहे.

कारण का मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला कि कॉमर्स आणि अकाऊंट शिवाय इतर काही शिकत असू तर आम्हाला तेथे नोकरीच्या काय संधी उपलब्ध आहेत?

तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध आहेत पण त्यासाठी जपानी भाषेबरोबर तुम्हाला अजून एक स्किल्स मिळवावे  लागतील ते म्हणजे लोकांचा व जापान मधील नियमांचा विचार करणे.

असो जर तुम्ही CS असाल आणि सध्या तुम्ही अकाउंट फायनान्स मध्ये काम करत असाल तर तुम्ही N2 झाल्यावरती नक्कीच इथे जॉबसाठी अर्ज करू शकतात. पण जर तुम्ही CS करत असाल तर तुम्हाला जपानचा कायदा Law शिकण्याची गरज आहे कारण का तुम्ही भारतातील कायदा Law इथे वापरू शकत नाही हे लक्षात ठेवा.

मग अजून तुम्हाला याबरोबर काय करता येईल?  या बरोबर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या कंट्रोलिंग व फायनान्समध्ये  / ऑडिटमध्ये / ग्लोबल कंपनीमध्ये / ट्रॅव्हल इंडस्ट्री मध्ये नक्कीच तुम्हाला काम करायची संधी मिळेल.

आणि जर तुम्ही डिझाईनिंग करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा खूप संधी उपलब्ध आहेत फक्त तुम्हाला जापान मधील ऍनिमेशनचे ज्ञान हवे आणि त्याबद्दल तुम्ही आत्ता पासून जर तयारी केली आणि त्यामध्ये तुमचे स्किल्स वाढवले तर नक्कीच तुमच्या स्किल्स वरती तुम्हाला इथे नोकरी मिळू शकते.

सॉफ्टवेअर लोकांना तर प्रचंड संधी आहेत कारण सॉफ्टवेअर मध्ये AI (Artificial Inteligence), IOT (Internet Of Things) यांच्याबद्दल खूपच लोकप्रियता आहे आणि ज्या प्रमाणे जपानमध्ये लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे त्याप्रमाणे रोबोट्स आणि ह्या इतर नवीन technologies ची जास्तीच गरज आहे.

जापान खूप मोठ्या सॉफ्टवेअरच्या बदलातून जात आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही संदर्भात जर का सॉफ्टवेअर अनुभव असेल व भाषा येत असेल तर तुम्ही जापानला येऊ शकता.

सर्वात महत्वाचे सांगायचे म्हणजे की जापान हा खूप प्रामाणिक देश आहे व या देशामध्ये भ्रष्टाचार (Corruption) शून्य टक्के आहे त्यामुळे इथे कोणीही कोणत्याही कामासाठी पैसे मागत नाही किंवा पैसे देत नाही त्यामुळे जर का तुम्हाला जापान मध्ये नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी कोणी पैसे मागितले तर ते पूर्णपणे खोटे आहे.

कृपया जपानला येण्यासाठी कुठल्याही व्यक्ती कडे कुठलेही पैसे देऊ नयेत. जपानला येण्यासाठी खूप मोठे स्कॅम व फसवेगिरी चालू आहे आणि लोक लाखांमध्ये पैसे उकळत आहे तरी कृपया जापान सरकार किंवा जापान मधील University or Institute शिवाय कोणालाही कुठल्याही प्रकारे पैसे देऊ नयेत.

जपानी भाषेची सुरुवात कुठून व कशी करावी? कुठे शिकावी?

तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल, जपानी भाषा हि संपूर्णपणे भारतीय भाषेप्रमाणे आहे. जरी त्याचे शब्द व लिहिण्याची पद्धत वेगळी असली तरी त्याचे व्याकरण हे संस्कृत भाषेप्रमाणे आहे. म्हणून तुम्ही जपानी भाषा हि मराठी / हिंदी / गुजराथी  / तमिळ मधून शिका.

जपानी भाषा ही आशियाई भाषा असल्यामुळे त्याचे व्याकरण पाश्चिमात्य देशासारखे (Wester Countries) नाही, त्यामुळे शिकायला अवघड ही नाही. आधीच्या पोस्टमध्ये मी लिहिले होते की जरी तुम्हाला इंग्रजी येत नसेल तरी तुम्ही जपानी भाषा सहज शिकू शकता.

भारतीय भाषा व जापानी भाषा व्याकरण हे :
कर्ता (Subject) + कर्म (Object)   + क्रियापद (Verb)
मी  पाणी  पितो / पिते

जापानी भाषा व्याकरण हे सुद्धा :
कर्ता (Subject) + कर्म (Object)  + क्रियापद (Verb)
वाताशी (मी)  मिझु ओ (पाणी) नोमिमासू ( पितो / पिते)

पाश्चिमात्य देशासारखे (Wester Countries) व्याकरण हे :
कर्ता (Subject) + क्रियापद (Verb)  + कर्म (Object)
I Drink Water

जपानी भाषे मध्ये ३ लिपी येतात
– हिरागाना (मूळ जपानी भाषेतील शब्द ह्या लिपीत लिहिले जातात)
– काताकाना (इतर भाषेतील शब्द ह्या लिपीत लिहिले जातात)
– कांजी (ही चीन कडून स्वीकारलेली चित्ररूपी भाषा आहे)

त्यामुळे जर तुम्हाला जपानी भाषा शिकायची असेल तर प्रथम हिरागाना व काताकाना लिपी स्वतःहून शिकायला सुरवात करा. Hiragana व  Katakana ह्या लिपी Google, YT किंवा मोबाइल अँप्लिकेशन वर शिकू शकता. ह्यासाठी कोणतीही tuition / class लावायची गरज भासत नाही. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे.

जपानी भाषेच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. त्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी JLPT (Japanese Language Proficiency Test) ही परीक्षा देतात.

ह्यामध्ये  5 Level असतात . त्या खालील प्रमाणे:

  • N5 – Beginner Level (पहिली परीक्षा)
  • N4 – Basic Level
  • N3 – Intermediate Level
  • N2 – Business Level 
  • N1 – Native Level

वरील प्रमाणे जपान मध्ये येण्यासाठी N2 Business Level ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. साधारणतः ह्या ४ परीक्षा पास होण्यास ३ वर्षे कालावधी लागतो. त्यामुळे ११ वी /१२ वी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आता पासून जपानी भाषा शिकायला सुरवात करावयास काही हरकत नाही.

त्यासाठी क्लास हा तुम्ही तुमच्या मातृभाषेत लावला तर भाषा शिकायला सोपे जाते.

मला बऱ्याच जणांनी विचारले भाषा कुठे शिकू त्याबद्दलपुण्यामधील काही नाव व संपर्क नंबर माझ्या ब्लॉगवर दिला  आहे. तुम्ही त्या शिक्षकांना संपर्क करू शकता (जपानी भाषेत शिक्षकांना ‘सेनसेई’ म्हणतात). 

मला खूप जणांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत व त्याच बरोबर विविध प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत. बरेचजण व्हाट्सअप किंवा स्वतंत्र मेसेज करून प्रश्न विचारत आहेत. पण वेळेअभावी प्रत्येकाला स्वतंत्र मेसेज करणे कठीण आहे.त्यामुळे मी सर्वाना विनंती करतो की कृपया आपण आपले प्रश्न हे फक्त माझ्या ब्लॉग वरच “Contact” https://mogheg.blog/contact/  मध्ये जाऊन  विचारावे.

Share this:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *